Dailyhunt
पत्नीच्या सांगण्यावरून पतीवर हल्ला; शिरूरमध्ये खळबळ

पत्नीच्या सांगण्यावरून पतीवर हल्ला; शिरूरमध्ये खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नीनेच दोन अनोळखी व्यक्तींना पतीवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरात घडली असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम वाल्मीक टोनगे (वय ३६, रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील श्री हाइट्स सोसायटीसमोर, शिरूर-रामलिंग रस्त्याच्या कडेला ही घटना घडली.

फिर्यादी यांची पत्नी चित्रा विक्रम टोनगे (सध्या रा. फाकटे, ता. शिरूर) हिने "पोटगी संदर्भात चर्चा करू" असे सांगून त्यांना न्यायालयातून आपल्या मागे येण्यास सांगितले. त्यानुसार दोघे मोटारसायकलवरून जात असताना रस्त्याच्या कडेला झाडाखाली दोन अनोळखी इसम स्प्लेंडर मोटारसायकलसह उभे होते. पत्नी त्यांच्याजवळ जाऊन बोलू लागल्याने फिर्यादीही तिथे गेले.

यावेळी चित्रा टोनगे हिने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत त्या दोन इसमांना मारहाण करण्यास सांगितले. त्यानंतर एका इसमाने वाहनाच्या वायरच्या साहाय्याने, तर दुसऱ्या इसमाने कंबरेच्या बेल्टने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण करून दुखापत केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत. यातील आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka