Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणेकरांची नवी ओळख! MH-12 नंतर आता वाहनांना मिळणार MH-61 पासिंग

पुणेकरांची नवी ओळख! MH-12 नंतर आता वाहनांना मिळणार MH-61 पासिंग

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' असं अभिमानाने म्हणणाऱ्या पुणेकरांसाठी वाहनांच्या नंबरप्लेटवरील MH-12 ही केवळ एक मालिका नाही, तर पुण्याची ओळख आहे. मात्र, आता पुणेकरांच्या वाहनांना आणखी एक नवी ओळख मिळणार आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून चारचाकी वाहनांसाठी 'MH-61' ही नवीन मालिका सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या चारचाकी वाहनांना आता MH-61 A 0001 या धर्तीवर क्रमांक मिळणार आहेत.

पुणे आरटीओमधील MH-12 मालिकेची उपलब्ध संख्या संपल्याने नवीन मालिका सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार MH-61 ही मालिका निश्चित करण्यात आली आहे. पुण्यात वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने नवीन मालिकेच्या पहिल्या दिवशी आरटीओमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी तसेच पसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारले जाणार असून, पसंतीच्या क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया देखील राबवण्यात येणार आहे.

MH-12 मालिका पुढे का सुरू ठेवता आली नाही?

पुण्याची ओळख असलेली MH-12 मालिका दुचाकी वाहनांच्या नोंदणीत MH-12 ZZ पर्यंत पोहोचली होती. मोटार वाहन नोंदणीच्या सध्याच्या पद्धतीनुसार दोन अक्षरांनंतर थेट तीन अक्षरांची MH-12 AAA अशी मालिका सुरू करण्याची तरतूद नसल्याने पर्यायी क्रमांक मालिकेचा विचार करण्यात आला.

पुणेकरांची MH-12 ही ओळख कायम ठेवण्यासाठी 'MH-12 1A' असा प्रस्तावही पुढे आला होता. यासाठी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, MH-12 1A पेक्षा नवीन MH-61 मालिका सुरू करणे अधिक सोपे असल्याने अखेर MH-61 या पर्यायाला मंजुरी देण्यात आली.

MH-61 चा मान पुण्याला

महाराष्ट्रात वाहन नोंदणीसाठी MH कोडअंतर्गत विविध आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना स्वतंत्र क्रमांक मालिका देण्यात आल्या आहेत. वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन मालिकांचे वाटप करण्यात आले आहे.

MH-51 - पेण/अलिबाग

MH-52 - रत्नागिरी उपविभाग

MH-53 - पिंपरी-चिंचवड

MH-54 - वाशी/नवी मुंबई

MH-55 - कल्याण-डोंबिवली

MH-56 - छत्रपती संभाजीनगर

MH-57 - जळगाव उपविभाग

MH-58 - नाशिक उपविभाग

MH-59 - सोलापूर उपविभाग

MH-60 - संगमनेर, अहिल्यानगर उपविभाग

MH-61 - पुणे

त्यामुळे MH-60 नंतर MH-61 ही मालिका पुण्याच्या वाहनांना मिळणार आहे. पुणेकरांसाठी MH-12 ही पारंपरिक ओळख कायम असली, तरी आता रस्त्यावर धावणाऱ्या नव्या चारचाकी वाहनांवर MH-61 ही नवी ओळख दिसणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka