Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यभरात २९ सप्टेंबरला 'रोजगार महाकुंभ'; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

राज्यभरात २९ सप्टेंबरला 'रोजगार महाकुंभ'; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात 'रोजगार महाकुंभ' आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमात महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 'महाविद्यालयात रोजगार महाकुंभ महाराष्ट्र' या उपक्रमासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

पदवीसोबत रोजगाराभिमुख कौशल्यांवर भर

राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण न देता त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये मिळणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये यांची सांगड घालण्यासाठी महाविद्यालयांनी उद्योग, कंपन्या आणि उद्योजकांशी समन्वय वाढवावा. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आणि 'रोजगार महाकुंभ' आयोजित करावेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

'रोजगार महाकुंभ'च्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध कंपन्या, उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून तरुणांना थेट मुलाखतीची संधी मिळू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यासोबतच त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगार मिळण्यास मदत होईल.

उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण

महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावे नियमितपणे आयोजित करावेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी मिळावी, यासाठी शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

'रोजगार महाकुंभ' हा राज्यातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. त्यामुळे अधिकाधिक महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka