Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेतकरी एकजुटीचा परिणाम; नागरगावात उसाला ४३०० रुपयांचा दर जाहीर

शेतकरी एकजुटीचा परिणाम; नागरगावात उसाला ४३०० रुपयांचा दर जाहीर

शिरूर : अपेक्षित उसदरासाठी शिरूर आणि दौंड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी एल्गाराला आता यश मिळताना दिसत आहे. नागरगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा केली.

त्यांच्या निर्णयाचे उपस्थित शेतकऱ्यांनी स्वागत केले.

रांजणगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अपेक्षित दर मिळाला नाही, तर सध्या सुरू असलेल्या ऊसतोडी वगळता ५ सप्टेंबरपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला होता. त्यामुळे उसदराचा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता.

दरम्यान, नागरगाव येथील सभेत उसदरावर चर्चा सुरू असतानाच गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन बाजारभाव देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मांडवगण येथेही शेतकऱ्यांची सभा झाली. उसाला किमान ५००० रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी सभेत सर्वानुमते करण्यात आली. तसेच २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पारगाव येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

शिरूरमध्ये उसदराची कोंडी फुटण्याची चिन्हे

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांनंतर सर्वाधिक गुऱ्हाळे दौंड तालुक्यात असून, सध्या तालुक्यात सुमारे ७०० गुऱ्हाळे सुरू आहेत. दौंड तालुका ऊस उत्पादनातही जिल्ह्यात आघाडीवर आहे. मात्र, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे उसदराच्या प्रश्नाला निर्णायक वळण मिळताना दिसत आहे.

शेतकऱ्यांची एकजूट, सामूहिक निर्णय आणि योग्य दरासाठीचा संघर्ष यामुळे नागरगाव येथे जाहीर झालेला ४३०० रुपयांचा दर हा शेतकरी एकजुटीचा विजय मानला जात आहे.

साखर आणि गुळाच्या दरातील घसरणीचा परिणाम

साखरेचा दर ७० रुपयांवरून ६२ रुपयांवर आला असून, गुळाचा दरही ६५ रुपयांवरून ५२ ते ५५ रुपये किलोपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारस्थितीत उसाचा दर निश्चित करणे गुऱ्हाळमालकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

गुऱ्हाळमालकांच्या माहितीनुसार, एकदा ऊसतोड सुरू केल्यानंतर पुढील सुमारे १५ दिवस पुन्हा दर निश्चित करणे शक्य होत नाही. बाजारभाव स्थिर झाल्यानंतर दराबाबत निर्णय घेणे योग्य ठरेल, अशी त्यांची भूमिका आहे.

गुळाच्या बाजारभावातील चढ-उताराचा थेट परिणाम ऊस उत्पादकांच्या अपेक्षांवर होत असून, आता इतर गुऱ्हाळमालकांकडून कोणता दर जाहीर केला जातो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka