Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाहन मालकी हस्तांतरणासाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य; देशभरात एकसमान ऑनलाइन प्रक्रिया

वाहन मालकी हस्तांतरणासाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य; देशभरात एकसमान ऑनलाइन प्रक्रिया

वी दिल्ली : वाहन मालकी हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी देशभरात आता एकसमान आणि प्रमाणित ऑनलाइन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाइन वाहतूक सेवांची एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मालकी हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र सेवांसाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. संबंधित प्राधिकरणांनी या कार्यपद्धतीला मान्यता दिल्यानंतर त्यानुसार सेवांवर प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील (RC) नाव आणि आधार कार्डवरील नावामध्ये तफावत असल्यास ऑनलाइन प्रणालीमध्ये सूचना संदेश प्रदर्शित होतो. अशा वाहनमालकांनी आधार कार्डवरील आणि RC वरील नावात आवश्यक ती दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.

नावातील तफावत दुरुस्त केल्यानंतर वाहन ४.० प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच वाहन मालकी हस्तांतरण किंवा NOC साठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

तसेच, आधार कार्डवरील पिन कोड अद्ययावत करण्यासाठी संबंधित आधार केंद्राशी संपर्क साधण्याचे, तर संपर्करहित सेवांचा लाभ घेण्यासाठी RTO कार्यालयाला भेट देण्याचे किंवा उपलब्ध मोबाइल प्रमाणीकरण सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनमालकांना वाहनांशी संबंधित विविध ऑनलाइन सेवांचा सहज लाभ घेण्यासाठी आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

RC आणि आधार कार्डवरील नावात तफावत असल्यास ऑनलाइन प्रक्रिया अडू शकते. त्यामुळे वाहनमालकांनी कागदपत्रांमधील माहिती अद्ययावत करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka