Dailyhunt
धुळदेव यात्रेत भाविकांसाठी प्रथमच अद्ययावत सुविधा; पंचायत समिती सदस्य सचिन (अध्यक्ष) अभंग यांच्या ऐतिहासिक कार्याचे सर्वत्र कौतुक

धुळदेव यात्रेत भाविकांसाठी प्रथमच अद्ययावत सुविधा; पंचायत समिती सदस्य सचिन (अध्यक्ष) अभंग यांच्या ऐतिहासिक कार्याचे सर्वत्र कौतुक

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या धुळदेव यात्रेत विडणी गणाचे नूतन पंचायत समिती सदस्य सचिन (अध्यक्ष) अभंग यांनी स्वखर्चातून संपूर्ण परिसर हॅलोजन लाईट्सने प्रकाशित करत महिलांसाठी विशेष स्नान व्यवस्था उभी केली आहे.

त्यांच्या या तत्पर कार्याचे भाविकांमधून मोठे कौतुक होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 7 एप्रिल : शेकडो वर्षांची परंपरा आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धुळदेव यात्रेत यंदा एक नवा इतिहास घडला आहे. विडणी गणाचे नूतन पंचायत समिती सदस्य मा. श्री. सचिनराव (अध्यक्ष) अभंग यांनी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी ज्या ऐतिहासिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

वर्षानुवर्षे या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. मात्र, यात्रेत अनेक मूलभूत गैरसोयींचा सामना भाविकांना करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी असणारा अंधार आणि महिला भाविकांसाठी अंघोळीची कोणतीही योग्य सोय नसणे, ही एक मोठी आणि प्रलंबित समस्या होती. आजवर अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले, मात्र ही गैरसोय तशीच होती.

हीच अडचण ओळखून सचिन अभंग यांनी थेट मैदानात उतरून धडाकेबाज काम करून दाखवले. त्यांनी स्वतःच्या खर्चातून संपूर्ण यात्रा परिसरात हॅलोजन लाईट्स लावून परिसर उजळून टाकला, ज्यामुळे रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय कायमची दूर झाली. यासोबतच, महिला भाविकांची अडचण ओळखून त्यांनी शॉवरसह तात्पुरती परंतु उत्तम स्नान व्यवस्था उभी करून दिली.

ज्या सुविधा शेकडो वर्षांत उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, त्या सचिन अभंग यांनी अत्यंत कमी वेळात आणि तत्परतेने उभ्या केल्याने भाविकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामामुळे "अध्यक्ष म्हणजे काम… आणि काम म्हणजे अध्यक्ष!" अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया यात्रेकरू आणि ग्रामस्थांमधून दिली जात आहे.

जनतेसाठी काम करण्याची ही तळमळ पाहून विडणी गणातील जनतेचा आपल्या या नूतन लोकप्रतिनिधीवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे. सचिनराव अभंग यांच्या या तत्पर कार्यामुळे 'ही तर फक्त सुरुवात आहे, भविष्यात विडणी गणात अशी अनेक मोठी आणि लोकोपयोगी कामे पाहायला मिळतील,' असा विश्वास जनतेमधून व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya