Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुष्काळात जनावरांचे संरक्षण कसे करावे?

दुष्काळात जनावरांचे संरक्षण कसे करावे?

एलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी चारा, पाणी आणि आहार व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन.

स्थैर्य, पुणे, दि. २९ ऑक्टोबर : एलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा पशुपालनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि प्रजननक्षमता टिकवण्यासाठी चारा, पाणी व आहाराचे योग्य पूर्वनियोजन करणे पशुपालकांसाठी अत्यंत आवश्यक बनले आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने एलनिनोचा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घटते आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होते. याचा थेट फटका जनावरांच्या आरोग्याला बसून दूध उत्पादनात घट, वजन कमी होणे आणि प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कुपोषण आणि प्रतिकूल वातावरणामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते.

दुष्काळाच्या काळात जनावरांना पुरेसा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देणे हे सर्वांत मोठे आव्हान असते. यासाठी उपलब्ध हिरव्या चाऱ्याचा योग्य वापर करून मुरघास तयार करणे आणि कडबा सुरक्षित ठिकाणी साठवणे गरजेचे आहे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करून पाण्याच्या टाक्या सावलीत ठेवाव्यात. अतिउष्ण वेळेत जनावरांची वाहतूक टाळावी आणि गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

दुष्काळात उष्णतेचा ताण आणि अपुऱ्या आहारामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार लसीकरण आणि जंतनाशक औषधांचा वेळेवर वापर करावा. चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांच्या संख्येचे नियोजन करावे. निरोगी आणि अधिक दूध देणाऱ्या जनावरांच्या पोषणाला प्राधान्य देऊन, संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी आतापासूनच पूर्वनियोजन करणे फायदेशीर ठरते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya