Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जाधववाडीच्या माळरानावर युवकाचा संशयास्पद मृत्यू

जाधववाडीच्या माळरानावर युवकाचा संशयास्पद मृत्यू

दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२६ | फलटण | फलटण शहरालगत जाधववाडी येथील योद्धा अ‍ॅकॅडमीच्या मागील बाजूस मोकळ्या माळरानावर रविवारी (ता. २) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली.

प्राथमिक तपासानंतर मृताची ओळख नीलेश भगवान जाधव (वय ३८, व्यवसाय मेंढपाळ, रा. पिंपरद, ता. फलटण) अशी पटली आहे. संबंधित मृतदेह प्रथम गुरे चारणार्‍या गुराख्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ स्थानिक ग्रामस्थ आणि फलटण शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी करून घटनास्थळ सुरक्षित केले. पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्याच परिसरात नीलेश जाधव याची दुचाकी (एमएच ११ सीडी ६९४३) उभी असल्याचे आढळले, तसेच मृताच्या डाव्या मांडीवर आणि पायावर किरकोळ जखमा असल्याचेही निदर्शनास आले आहे. या जखमा अपघातामुळे झाल्या की अन्य कारणामुळे, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही.घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, ही घटना अपघाताची आहे, की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत पोलिसांनी कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. शवविच्छेदन अहवाल, तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अधिक तपास पोलिस अंमलदार रणवरे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya