फुले शाहू आंबेडकर फाउंडेशनच्या सत्यशोधक विवाह चळवळीचे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे कौतुक केले असून, या उपक्रमामुळे समाजात समता व मानवतावादी मूल्ये रुजत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थैर्य, माण, दि. 09 एप्रिल : महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ५५ व्या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष कौतुक केले आहे. माण तालुक्यातील वावरहिरे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना पत्र पाठवून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या २१ वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करत संस्थेने अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनाठायी खर्चाला फाटा दिला आहे. साध्या आणि समाजप्रबोधनात्मक पद्धतीने सत्यशोधक विवाह घडवून आणण्याचे अत्यंत मोलाचे कार्य फाउंडेशनने केले असून, ही चळवळ राज्याबाहेरही पोहोचवल्याबद्दल भुजबळ यांनी पत्रात अभिमान व्यक्त केला.
नागपूर येथे प्रतीक्षा पोहनकर आणि विकास बोराटे यांचा सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला. हा सोहळा सामाजिक परिवर्तनाचा आदर्श नमुना ठरेल आणि या उपक्रमांमुळे समाजात समता, बंधुता व मानवतावादी मूल्ये अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवदांपत्याला भावी आयुष्यासाठी त्यांनी मनःपूर्वक सदिच्छा देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

