Wednesday, 05 Aug, 5.20 am स्थैर्य

मुख्य पान
पलूस शहराच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

स्थैर्य, मुंबई, दि. 4 : पलूस शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानामधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता द्यावी, त्याआधारे नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पलूस शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विशेष बाब म्हणून ही मान्यता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


पलूस पाणीपुरवठा योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पलुस शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ही योजना महत्वाची असल्याने या योजनेला विशेष बाब म्हणून मान्यता देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव मनोज सौनिक, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी, पलूस नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पलूस शहराची पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्णत्वाला जावी यासाठी याबाबतची त्वरित कार्यवाही सुरु करावी, पलूस शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल. या योजनेमुळे पलूसच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. योजनेचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya
Top