फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, संस्कार आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून दिला महत्त्वाचा सल्ला.
स्थैर्य, फलटण, दि. 09 एप्रिल : फलटण येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, संस्कार आणि मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना योग्य सवयी आणि तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर याबाबत थेट मार्गदर्शन केले.
या शिबिरात माजी प्राचार्य शाहीन शेख यांनी विद्यार्थ्यांना संस्कार आणि आरोग्य या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर सायली बगाडे यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून विद्यार्थ्यांना योग्य सल्ला दिला. शिक्षिका तृप्ती शिंदे यांनी या शिबिराचे सूत्रसंचालन केले.
या शिबिरास मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंत शेडगे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक रवींद्र नाळे, पूजा पाटील, आर. बी. निंबाळकर, एच. यु. बुचडे, हेमलता कदम आणि शालेय आरोग्य विभाग प्रमुख कांचन शिंदे यांनी सहभाग घेतला.
रणरागिणी संस्थेच्या वतीने संचालिका रझिया शेख, सचिव मारुती टकले आणि इमरान सय्यद उपस्थित होते. या शिबिराला ज्युनिअर आणि माध्यमिक विभागाचे इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

