Dailyhunt
राजाळेत बाबासाहेब व माता रमाई यांच्या विवाह सोहळ्याचे नाट्यरूप सादरीकरण; महिला जयंती महोत्सव समितीचा अनोखा उपक्रम

राजाळेत बाबासाहेब व माता रमाई यांच्या विवाह सोहळ्याचे नाट्यरूप सादरीकरण; महिला जयंती महोत्सव समितीचा अनोखा उपक्रम

राजाळे (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या विवाह संस्कार दिनानिमित्त नाट्यरूप विवाह सोहळ्याचा अत्यंत अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. 6 एप्रिल : राजाळे (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदा अत्यंत अभिनव उपक्रम राबवत जयंती साजरी केली जात आहे. दि. ४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विवाह संस्कार दिनाचे औचित्य साधून, गावातील धम्मदीप बुद्ध विहारात नाट्यरूप सादरीकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचा अनुभव साकारण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या नाट्यरूप विवाह सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटणचे माजी सरचिटणीस व बौद्धाचार्य आयुष्यमान बाबासाहेब दिलीप जगताप यांनी साजेसी भूमिका साकारली. तर, त्यागमूर्ती माता रमाई यांच्या भूमिकेत आयु. पारिजातका बाबासाहेब जगताप यांनी अत्यंत प्रभावी आणि भावनिक अभिनय करत सर्वांची मने जिंकली.

या सोहळ्याचे बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यांनी संपूर्ण विधी पार पाडला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी महिला समितीच्या सदस्यांनी स्वतःहून केली असून, गावातील सर्व महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

या विशेष कार्यक्रमाप्रसंगी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (इंग्लंड) येथून एलएलबी, तसेच आयआयटी दिल्ली व एलबीएस कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेतलेले ॲड. निखिल रेखा संजय अडसूळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित महिलांशी थेट संवाद साधला.

आपल्या मनोगतात त्यांनी या अनोख्या उपक्रमाचे मनभरून कौतुक केले आणि महिलांच्या पुढाकाराचे विशेष अभिनंदन केले. तसेच, बुद्ध, धम्म आणि संघाच्या विचारांचा अंगीकार करून ते विचार आपल्या पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहनही ॲड. अडसूळ यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला आयु. सुमनबाई खरात, बहिणाबाई भालेराव, शोभा भालेराव, सुरेखा भालेराव, विश्रांती गायकवाड, कुसुम भालेराव, सीमा भालेराव, कल्पना भंडारे, मालन भालेराव, तृप्ती भालेराव, नीलम भालेराव, उज्वला भालेराव, नंदाताई भालेराव, शितल भोसले, अंजली खरात, उमा भालेराव, हौसाबाई खरात, राणी भोसले, चंदाराणी भालेराव, दीपाली कांबळे, शुभांगी भालेराव, मीनाक्षी खरात, शिवानी गायकवाड, ज्योती खरात, अश्विनी भालेराव, सुज्ञा भालेराव, स्वाती कांबळे, काजल सरतापे, संजना रणपिसे, प्रतीक्षा भालेराव, संगीता गायकवाड, कोमल भालेराव, सुप्रिया भालेराव, मानसी भालेराव, स्नेहलता आईवळे, मंगला आईवळे, पुनम भालेराव, रेखा भालेराव, वैशाली भालेराव, चारुशीला भालेराव, माधुरी भालेराव, सोनाली भालेराव, पूजा भालेराव, मोनाली सरतापे, शारदा मिसाळ, सारिका झेंडे, पुष्पा मोरे, उज्वला खरात, रेखा मोरे, छाया जगदाळे, राणी निकाळजे, अनिता खरात, सरिता भालेराव आदी उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या अनोख्या आणि भावपूर्ण विवाह सोहळ्यामुळे राजाळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya