Dailyhunt
समता सैनिक दलाच्या वतीने दहिवडीत एकदिवसीय 'महिला सैनिक शिबीर' उत्साहात संपन्न

समता सैनिक दलाच्या वतीने दहिवडीत एकदिवसीय 'महिला सैनिक शिबीर' उत्साहात संपन्न

मता सैनिक दलाच्या वतीने दहिवडी (ता. माण) येथे एकदिवसीय महिला सैनिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिलांना उत्कृष्ट ड्रिलचे प्रशिक्षण देत समता सैनिक दलाचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.

स्थैर्य, दहिवडी, दि. 5 मे : समता सैनिक दलाच्या वतीने दहिवडी (ता. माण) येथे रविवारी (दि. ३ मे) एकदिवसीय महिला सैनिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिला सैनिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराच्या प्रसंगी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच महाराष्ट्र राज्य संघटक, पुणे व सातारा जिल्हा प्रभारी मा. दादासाहेब भोसले यांनी उपस्थित राहून महिला सैनिकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

तसेच, राज्याच्या संघटक तथा केंद्रीय शिक्षिका राजश्री सरवदे यांनी महिलांना संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन केले. सातारा जिल्हा पूर्वच्या महिला अध्यक्षा सुजाता गायकवाड यांनी महिलांना सामाजिक बांधिलकी जपत स्वतःमधील नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले. तर, माण तालुका महिला अध्यक्षा स्नेहल बनसोडे यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

या शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा (सातारा जिल्हा पूर्व) चे संरक्षण उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख शिक्षक मेजर संपत भोसले यांनी उपस्थित महिलांना उत्कृष्ट 'ड्रिल'चे (कवायत) प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणातून त्यांनी शिस्त, संघटन आणि सैनिक जीवनातील महत्त्व पटवून दिले. तसेच, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'समता सैनिक दला'चे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व त्यांनी महिलांना सविस्तरपणे समजावून सांगितले.

या एकदिवसीय शिबिरात विविध प्रशिक्षण सत्रे, मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध उपक्रम पार पडले. सर्वांच्या सहभागातून या शिबिराचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

हे प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका महिला विभाग आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व महिला विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya