Dailyhunt
'सत्याचा आसूड' ही कादंबरी 'सर्ज्या'प्रमाणेच श्रेष्ठ; ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांची सुरेश शिंदे यांच्या लेखनाला मोठी पोचपावती!

'सत्याचा आसूड' ही कादंबरी 'सर्ज्या'प्रमाणेच श्रेष्ठ; ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांची सुरेश शिंदे यांच्या लेखनाला मोठी पोचपावती!

लटण येथील प्रसिद्ध कादंबरीकार सुरेश पां. शिंदे यांच्या 'सत्याचा आसूड' या कादंबरीचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी पत्राद्वारे विशेष कौतुक केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ७ मे : फलटण येथील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारप्राप्त लेखक मा. सुरेश पां. शिंदे यांना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक मा. भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच एक विशेष पत्र पाठवले आहे. या पत्रात नेमाडे सरांनी शिंदे यांच्या 'सत्याचा आसूड' या कादंबरीचे तोंडभरून कौतुक करत, ती त्यांच्या 'सर्ज्या' कादंबरीप्रमाणेच श्रेष्ठ असल्याचे सूचित केले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या पत्रात आवर्जून नमूद केले आहे की, "मी ही कादंबरी वाचली आणि मला ती खूप आवडली. या कादंबरीतील गावाकडची ग्रामीण भाषा अत्यंत उत्तम आहे." तसेच, या कादंबरीत संवाद आणि तपशील जास्त वापरल्यामुळे 'मी' ला (आत्मचरित्रात्मक शैलीला) फार कमी जागा मिळाली आहे, हे या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापुढेही असेच एखादे मध्यवर्ती सूत्र पक्के करून नवीन कादंबरी लिहावी, असा बहुमोल सल्ला व मार्गदर्शनही नेमाडे यांनी या पत्रातून दिले आहे.

मराठी साहित्यातील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या भालचंद्र नेमाडे सरांसारख्या दिग्गज साहित्यिकाने स्वतःहून पत्र पाठवून साहित्याचे कौतुक करणे, ही सुरेश शिंदे यांच्या प्रगल्भ लेखकपणाची एक मोठी आणि अनन्यसाधारण पोचपावतीच मानली जात आहे. सरांनी वेळ काढून कादंबरी वाचल्याबद्दल आणि पत्र पाठवून आशीर्वाद दिल्याबद्दल लेखक सुरेश शिंदे यांनी त्यांच्याविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya