लग्नानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या 23 वर्षीय नववधूचा अवघ्या दहा दिवसांत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात समोर आली आहे. मध्यरात्री घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
मृत तरुणीचे नाव संध्या (वय 23) असे असून, तिचे लग्न दहा दिवसांपूर्वी 45 वर्षीय मुकेश कुमार लोहार याच्यासोबत झाले होते. दोघांच्या वयात 22 वर्षांचे अंतर असल्याने या विवाहाबाबतही विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या संदर्भातील सर्व बाबींची पडताळणी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 आणि 30 जुलैच्या मध्यरात्री घरातील सर्व सदस्य जेवणानंतर झोपले होते. रात्री सुमारे दोनच्या सुमारास पतीला जाग आली असता पत्नी खोलीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तिचा शोध घेतल्यानंतर घराच्या मागील बाजूस ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
घटनास्थळी तपासादरम्यान तिसऱ्या मजल्यावरील ग्रीलला दोर बांधलेला आढळून आला. तसेच दोराचा काही भाग मृतदेहाजवळही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात घरातून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थितीचा तपास अद्याप सुरू आहे.
या घटनेची माहिती पोलिसांनी तरुणीच्या माहेरच्या नातेवाईकांना दिली होती. मात्र, निर्धारित कालावधीत ते पोहोचू न शकल्याने शवविच्छेदनानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पतीच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
माणक चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विक्रम सिंग चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. तसेच, संबंधित बाबींची पडताळणी करण्यासाठी बिहार पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
