Dailyhunt

३१ वर्षांचा तुरुंगवास अन् आता वकिलीचा प्रवास;राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली

​मद्रास : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेले ए. जी. पेरारिवलन आता कायद्याच्या मैदानात उतरणार आहेत. ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटका केल्यानंतर, पेरारिवलन यांनी वकील म्हणून आपली अधिकृत नोंदणी केली असून ते आता वकिली करणार आहेत.

​मृत्यूदंडाच्या कोठडीतही शिक्षणाची जिद्द
​१९९१ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अटक झालेल्या पेरारिवलन यांनी तुरुंगाच्या भिंतींआड असूनही शिक्षणाची ओढ कायम ठेवली. त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून (IGNOU) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, मृत्यूदंडाच्या कोठडीत असतानाही त्यांनी अनेक डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करून आपली शैक्षणिक पात्रता सिद्ध केली होती.

​सुटकेनंतर ‘लॉ’ची पदवी आणि बार कौन्सिल नोंदणी
​१८ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत पेरारिवलन यांची सुटका केली होती. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील डॉ. बी. आर. आंबेडकर लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. २०२५ मध्ये त्यांनी अखिल भारतीय बार परीक्षा (AIBE) उत्तीर्ण केली आणि नुकत्याच झालेल्या एका समारंभात तामिळनाडू आणि पुदुचेरी बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून त्यांची नोंदणी झाली.


​चुकीच्या पद्धतीने अडकलेल्या कैद्यांना देणार न्याय

​वकिली क्षेत्रात पदार्पण करताना पेरारिवलन यांनी आपले ध्येय स्पष्ट केले आहे. “ज्या कैद्यांना चुकीच्या पद्धतीने किंवा पुराव्याअभावी तुरुंगात डांबण्यात आले आहे, त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल,” असे त्यांनी सांगितले. ते लवकरच मद्रास उच्च न्यायालयात वकिली सुरू करणार आहेत.

१९९१ च्या हत्याकांडातील स्फोटकासाठी ९-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. प्रदीर्घ कायदेशीर लढाई आणि ३१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर आता एका नव्या भूमिकेत ते समाजासमोर येत आहेत. त्यांच्या या संघर्षाची आणि शैक्षणिक जिद्दीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon