नशिराबाद येथील राजर्षी छत्रपती शिवाजीनगर, नवीन प्लॉट परिसरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. घरात झोपाळ्यावर खेळत असताना झोपाळ्याच्या दोरीचा गळ्याभोवती फास लागल्याने दीड वर्षांच्या सार्थक योगेश बन्हाटे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक घरातील झोपाळ्यावर खेळत होता. त्यावेळी अचानक झोपाळ्याची दोरी त्याच्या गळ्याभोवती अडकली. त्या वेळी त्याची आई घराबाहेर कपडे धुत होती. काही वेळाने ती घरात आली असता सार्थक अडचणीत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला दोरीतून बाहेर काढले.
चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने बन्हाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सार्थकला चार वर्षांची मोठी बहीण असल्याची माहिती आहे. घरातील लहान मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. नशिराबादमध्ये या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
