Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

'आता घाई नाही!' मराठी शिकण्यासाठी रिक्षाचालकांना आणखी एक वर्ष; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

हाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या अमराठी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

या मुदतीत मराठी शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीचे प्राथमिक ज्ञान असणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आवश्यक करण्याच्या निर्णयानंतर अमराठी चालकांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ मिळावा, अशी मागणी या चालकांनी केली. त्यांची मागणी लक्षात घेत सरकारने एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात काम करणाऱ्या चालकांना किमान व्यवहारापुरती मराठी येणे आवश्यक आहे. त्यासाठी चालक प्रयत्न करत असून वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना कमी कालावधीत भाषा आत्मसात करणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे त्यांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना सध्या मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मराठीचे ज्ञान नसल्यास परवान्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता पुढील वर्षभर चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ मिळणार आहे.

MPSC परीक्षांबाबतही मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका अनेक उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा दावा योग्य नसून ती एका व्यक्तीकडे गेल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिकेच्या प्रकरणानंतर संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय MPSCने घेतला आहे. भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यापुढील MPSC परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. परीक्षा प्रक्रियेच्या मुद्द्यावर राजकारण न करता सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon