शहरातील समाधान नगर परिसरात एका 16 वर्षीय मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरा मारुती जाधव असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
अक्षरा यंदा दहावीच्या वर्गात शिकत होती. प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासावरून आईने तिला सुनावल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळातच अक्षराने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
उपचारापूर्वीच मृत्यू
घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी अक्षराला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं.
अक्षराचे आई-वडील वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही हलाखीची असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेची पोलिसांनी अज्ञात कारणातून आत्महत्या अशी नोंद केली असून, आत्महत्येमागील नेमकं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
