जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहर व तालुक्यात पोलिसांनी राबविलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांवर मोठी कारवाई करण्यात आली. घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यापासून ते अवैध शस्त्रे, गावठी दारू, जुगार, फरार आरोपी, वाहतूक नियमभंग आणि प्रतिबंधात्मक कारवाईपर्यंत अनेक आघाड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी धडक मोहीम राबवली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत १७ अधिकारी आणि ९० पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
मोहीमेदरम्यान घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून कार, मोटारसायकल, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ७.३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला आहे. वेगळ्या कारवाईत एका संशयिताकडून तलवार, गुप्ती आणि इतर धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. शस्त्र बाळगल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात कारवाई करत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हातभट्टीचे रसायन, तयार गावठी दारू तसेच दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. अमळनेर शहरातील एका ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन किंवा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या ११३ संशयितांची तपासणी करण्यात आली. २५ हिस्ट्रीशीटरची पडताळणी करण्यात आली, तर फरार आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी मोहिमा राबवून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच प्रलंबित वॉरंट आणि समन्सचीही बजावणी करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली. मोटार वाहन कायद्यानुसार अनेक प्रकरणांमध्ये दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, बदललेले सायलेंसर वापरणारे तसेच इतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरही गुन्हे नोंदविण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारची विशेष कॉम्बिंग ऑपरेशन्स भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाईचा धडाका कायम राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
