Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

अमळनेरच्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवमूर्ती सुरक्षित, मंदिर काही दिवस दर्शनासाठी बंद..!

मळनेर येथील संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात मंगळवारी रात्री भीषण आग लागून मंदिराच्या काही भागाचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, सीसीटीव्ही यंत्रणेजवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेनुसार, रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास मंदिराच्या वरच्या मजल्यावरील भागात आग लागली. लाकडी बांधकाम आणि ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही वेळातच मोठे स्वरूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अमळनेर व पारोळा नगरपरिषदांचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत खाजगी टँकरधारक आणि स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला.

आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने जवळील तालुक्यांमधून अतिरिक्त अग्निशमन बंब मागविण्यात आले. प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्याचे समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या बचावकार्यात विविध समाजातील नागरिकांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. आग विझविणे, पाणीपुरवठा करणे आणि बचावकार्यात मदत करणे यासाठी अनेक स्वयंसेवक पुढे सरसावले. या प्रसंगी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दरम्यान, आगीत मंदिराच्या काही भागाचे नुकसान झाले असले तरी मंदिरातील देवमूर्ती सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

आगीनंतर मंदिराच्या इमारतीची सुरक्षितता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. हा अहवाल प्राप्त होईपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकप्रतिनिधी, महसूल, पोलीस आणि नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवून गर्दी नियंत्रणात आणली, त्यामुळे अग्निशमन दलाला काम करणे सुलभ झाले.

दरम्यान, संत श्री सखाराम महाराजांची पारंपरिक पायी दिंडी नियोजितप्रमाणे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, दिंडीमध्ये सहभागी असलेले हभप प. पू. प्रसाद महाराज यांनी वारीची परंपरा कायम ठेवत प्रवास सुरूच ठेवला.

आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचे अंतिम स्वरूप तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon