मालाड पश्चिमेतील एस. व्ही. रोड-मामलेदारवाडी जंक्शनवर झालेल्या भीषण अपघातानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सिग्नलवर थांबलेल्या स्कूटर आणि तीन रिक्षांना भरधाव कारने धडक दिल्याने 34 वर्षीय महिला वकील प्रियंका मयांक सत्रा यांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेत त्यांचे पती तसेच रिक्षाचालकांसह इतर नागरिक जखमी झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी 70 वर्षीय कारचालक कृष्णा चमणकर याला अटक केली होती. मात्र, न्यायालयात हजर केल्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका झाली. यानंतर आता आरोपीवर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भाजप नगरसेवकांचा पोलिसांवर आरोप
प्रियंका सत्रा या भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या नातेवाईक असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांकडून 'व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळाल्याचा गंभीर आरोप छेडा यांनी केला आहे.
अपघाताच्या प्रकरणात केवळ औपचारिक कारवाई न करता घटनेची सखोल चौकशी करावी, तसेच आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून, पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले आहे.
दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं
या अपघातामुळे सत्रा कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. प्रियंका यांच्या पश्चात आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. आईच्या अचानक मृत्यूने दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या अपघातात प्रियंका यांचे पती मयांक सत्रा हे देखील गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही पत्नीला अखेरचं पाहण्यासाठी ते व्हीलचेअरवरून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचले. गंभीर अवस्थेतील पतीने पत्नीला दिलेला हा अखेरचा निरोप पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
अपघात की सदोष मनुष्यवध? तपासाकडे लक्ष
या घटनेनंतर आता आरोपीविरोधात कोणत्या कलमांनुसार कारवाई केली जाते आणि पोलिसांच्या तपासाची दिशा काय असणार, याकडे लक्ष लागले आहे. नगरसेवकांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांकडून या प्रकरणात पुढे काय पावले उचलली जातात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
