Dailyhunt

बाष्पीभवनामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी घट; पाणी कपात होणार ?

ळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम आता जलसाठ्यावरही दिसून येत आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाची पाणीपातळी तब्बल ३ टक्क्यांनी घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हतनुर धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमान ४५ अंशांच्या घरात पोहोचल्याने धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात वाफेच्या स्वरूपात कमी होत आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे ०.३३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची नोंद आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातच पाणीसाठ्यात घट जाणवू लागली असून, जलसाठ्याची टक्केवारीही घसरली आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा कमी होत चालल्याने सिंचन आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढती उष्णता आणि कोरडे हवामान यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर मे आणि जून महिन्यांत पाण्याचा तुटवडा अधिक तीव्र होऊ शकतो.

प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले असून, जलव्यवस्थापन अधिक काटेकोरपणे राबवण्याची गरज अधोरेखित केली आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon