Dailyhunt

बेघर व्यक्तीला मुलं पळवणारा समजून काही जणांकडून हल्ला; 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा.!

नंदुरबार जिल्ह्यात अलीकडे "मुले पळवणारी टोळी सक्रिय आहे" अशा अफवा पसरत असल्याचे समोर आले आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 28 एप्रिल 2026) समशेरपूर (ता. जि. नंदुरबार) येथे एक गंभीर प्रकार घडला.

एका बेघर व्यक्तीला मुलं पळवणारा समजून काही जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याची घटना उघड झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्तीचे नाव रघुभाई रामविरसिंग पटेल (वय 55, मूळ रहिवासी लालोर, जि. भेंड, मध्यप्रदेश) असे असून, त्यांना सुरक्षितपणे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील काळजी म्हणून त्यांना नंदुरबार येथील आधार बेघर निवारा गृहात हलविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ही व्यक्ती कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेत मारहाण करणाऱ्या 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 269/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2) आणि 115(2) अंतर्गत कारवाई सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित किंवा संशयास्पद संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवणे टाळावे आणि कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अफवा पसरवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारात सहभागी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

तसेच, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon