Dailyhunt

भाजपाचा विरोध मुस्लिमांना नव्हे, तर घुसखोरांना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

वी दिल्ली : भाजपा मुस्लिमांच्या नव्हे, तर घुसखोरांच्या विरोधात आहे, असे स्पष्ट करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी आसाम आणि पश्चिम बंगालमधील पक्षाच्या निवडणूक यशाबद्दल विश्वास व्यक्त केला.

आसाममधील विधानसभा निवडणुका १ एप्रिल रोजी नियोजित आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होईल आणि मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

आसाम आणि बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाचा विजय होईल, असा मला ठाम विश्वास आहे. कोणाचाही धर्म काहीही असो, सर्वांना सोबत घेऊन जाणे हे भाजपाचे धोरण आहे. आम्ही घुसखोरांच्या विरोधात आहोत. मात्र, मुस्लिमांच्या विरोधात नाही. असे गडकरी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पक्षाच्या विकासाभिमुख धोरणावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांमधील मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक आणि सुशासनावर भर देणारा दृष्टिकोन हे भाजपाच्या प्रचार रणनीतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आसामसह संपूर्ण ईशान्य भागात, सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले आहेत, तर १.५ लाख ते २ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. या व्यतिरिक्त आणखी दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प विचाराधीन आहेत, असे गडकरी म्हणाले.

सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पायाभूत सुविधांचे स्वरूप बदलेल

या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आसाम आणि ईशान्य भारताच्या पायाभूत सुविधांचे स्वरूप आमूलाग्र बदलेल; हा असा प्रदेश आहे ज्याला ऐतिहासिकदृष्ट्या दळणवळणाशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागला होता, असे ते म्हणाले. सर्वसमावेशकता हाच पक्षाच्या धोरणाचा गाभा आहे, असे गडकरी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. सर्वांना सोबत घेऊन चालणे हेच भाजपाचे धोरण आहे, असे ते म्हणाले. पक्षाचा विरोध घुसखोरीला असून, कोणत्याही धार्मिक समुदायाविरुद्ध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon