Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

भाषणादरम्यान अमित ठाकरे अचानक थांबले; "मला काय बोलायचं सुचत नाही," म्हणत व्यासपीठ सोडलं, मनसेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात अनपेक्षित प्रसंग..

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात एक अनपेक्षित प्रसंग घडला. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे भाषण करत असताना काही क्षणांसाठी थांबले आणि 'मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,' असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले.

काही वेळाने ते पुन्हा मंचावर आले आणि उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत आपले भाषण पूर्ण केले.

या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती. वर्धापनदिनानिमित्त सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. अलीकडील विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष होते.

कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचा उल्लेख

भाषणादरम्यान अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. आंदोलनामुळे संबंधित पातळीवर जबाबदारी निश्चित झाल्याचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांसाठी टाळ्यांची मागणी केली. तसेच, “मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर कदाचित राजकारणात आलो नसतो. मात्र, आज मी इथे उभा आहे, त्यामागे तुमचा विश्वास आणि साथ आहे,” असे ते म्हणाले.

“मी पाठ करून आलो नव्हतो”

भाषण पुन्हा सुरू करताना अमित ठाकरे यांनी आपण पूर्वतयारी करून भाषणासाठी आलो नव्हतो, असे सांगितले. सभागृहातील मोठी उपस्थिती पाहून क्षणभर शब्द सुचले नाहीत, असे त्यांनी हसत सांगितले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळातील संघटन विस्तार, नवीन प्रश्नांवर आंदोलन आणि विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

सदस्य नोंदणीवर भर

राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संघटना पोहोचवण्यावर भर देत अमित ठाकरे यांनी व्यापक सदस्य नोंदणी मोहिमेची घोषणा केली. प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी मजबूत विद्यार्थी संघटना उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान घडलेला हा अल्पविराम काही काळ चर्चेचा विषय ठरला. मात्र त्यानंतर अमित ठाकरे यांनी पुन्हा व्यासपीठावर येत भाषण पूर्ण केले आणि उपस्थितांना संघटनात्मक कामासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon