ठाणे जिल्यातील भिवंडी नारपोली परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली धोकादायक इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे एनडीआरएफसह विविध यंत्रणांकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
गंगाराम वाडी परिसरातील कोहिनुर नावाची हि इमारत महापालिकेने यापूर्वी धोकादायक घोषित केली होती. रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र काही नागरिक घरातील साहित्य आणि सामान काढण्यासाठी इमारतीत गेले असताना अचानक संपूर्ण इमारत कोसळली. काही क्षणांतच चार मजली इमारत जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आयजीएम शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान , प्रथमिक माहितीनुसार इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना तळमजल्यावरील काही आधारस्तंभांमध्ये बदल करण्यात आल्याने संरचनेचा तोल बिघडून इमारत कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दुर्घटनेचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
घटनास्थळी अद्याप शोधमोहीम सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बचावकार्य अधिक वेगाने सुरू ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
