Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

भुसावळ पुन्हा हादरलं! ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घृण खून; सात दिवसांत दुसरी हत्येची खळबळजनक घटना.!

भुसावळ शहरात पुन्हा एकदा खुनाची धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेच्या जलशुद्धीकरण (फिल्टर हाऊस) केंद्रात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, गेल्या सात दिवसांतील ही दुसरी खुनाची घटना आहे.

मृत कर्मचाऱ्याचे नाव प्रसाद यशवंत कुळकर्णी (वय ५८, रा. स्टार लॉनजवळ, भुसावळ) असे आहे. ते मध्य रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत होते. शनिवारी दुपारी ४ ते रात्री १२ या शिफ्टमध्ये ते ड्युटीवर होते. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ते कार्यालयात एकटे बसलेले असताना संशयिताने तेथीलच लोखंडी पट्टीने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.

या भीषण हल्ल्यात प्रसाद कुळकर्णी गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संशयित मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

भुसावळ शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवत आहेत.

विशेष म्हणजे, अवघ्या सात दिवसांपूर्वी म्हणजे २८ जून रोजी शहरातील कालिका माता मंदिर परिसरात संतोष रघुवीर मनचल (५३) या गॅरेज चालकाची भंगार चोरीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. त्या घटनेची भीती अद्याप कायम असतानाच आता रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्येने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon