Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

बोदवड तालुक्यात खाजगी क्लास चालकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार? संतप्त जमावाकडून संशयिताच्या गावात वाहनांची तोडफोड व जाळपोळ, तणावाचे वातावरण..

बोदवड तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर खासगी क्लासेस चालकाने अत्याचार केल्याच्या संशयावरून बुधवारी रात्री संतप्त जमावाने आक्रमक पवित्रा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संशयिताचे मूळ गाव असलेल्या बोदवड शहरातील घरासह परिसरात तणाव निर्माण झाला.

संतप्त जमावाने संशयिताच्या घराबाहेर असलेल्या वाहनांची जाळपोळ तसेच तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित क्लास चालक बुधवारी दुपारी काळ्या रंगाच्या कारमधून एका अल्पवयीन मुलीसोबत जामनेर रोडने जात होता. यावेळी काही तरुणांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. नंतर या प्रकरणाचा बोभाटा झाला.

बोदवड तालुक्यातील एका गावातील मूळ रहिवासी असलेला संशयित बोदवड शहरातील भुसावळ रस्त्यावरील इमारतीत खासगी क्लासेस घेत असल्याची माहिती आहे. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर संतप्त जमाव आक्रमक झाला. घटनेची माहिती मिळताच बोदवडसह आजूबाजूच्या तालुक्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत जमाव आक्रमक असल्याचे सांगण्यात आले.

संतप्त जमावाने संशयिताच्या घराबाहेर असलेल्या वाहनांना लक्ष्य केले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तर काही वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा फोडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित हे फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित होते.

रात्री सुमारे १२ वाजेपर्यंत जमाव आक्रमक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासनाने खबरदारी घेत अतिरिक्त कुमक मागवली. अधिकारी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. यानंतर रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पीडितेच्या नातेवाईकांना घेऊन उद्रेक झालेल्या गावाकडे रवाना होत जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यान, पोलिस ठाण्यात पीडितेचा जबाब घेण्याचे काम बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणात शोषण झालेल्यांची संख्या अधिक असल्याचा आरोपही संतप्त जमावाकडून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस तपासात या प्रकरणातून आणखी काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon