Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

बॉयफ्रेंडने गर्भवती गर्लफ्रेंडच्या कोल्ड्रिंकमध्ये टाकल्या डांबराच्या गोळ्या; कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर प्रकृती बिघडली अन् झाला मृत्यू, प्रियकराला अटक..

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. चारित्र्यावर संशय आणि दोघांमधील वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ तारखेला संबंधित महिला आणि तिचा प्रियकर आशिष मगर यांच्यात वाद झाला होता. वादानंतर आशिषने महिलेला शीतपेय दिल्याचं सांगितलं जात आहे. शीतपेय प्यायल्यानंतर काही वेळातच महिलेला उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली.

सुरुवातीला कुटुंबीयांनी हा त्रास गांभीर्याने घेतला नाही. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्यानंतर महिला चक्कर येऊन पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेलं. पुढे तिला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मृत्यूपूर्वी महिलेने आपल्या कुटुंबीयांना प्रियकर आशिषने आपल्याला शीतपेय दिल्याचं सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर कुटुंबीयांच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरसीएफ पोलिसांनी आशिष मगर याची कसून चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या शीतपेयात डांबराच्या गोळ्या मिसळल्याचा आरोप आहे. डॉक्टरांनीही महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, महिलेच्या मृत्यूमागील नेमकं कारण आणि या प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon