Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; धरणे ओव्हरफ्लो, नद्या-नाल्यांना पूर, लळींगमध्ये ढगफुटीसदृश पाऊस.

जुलैच्या अखेरीस धुळे जिल्ह्यात अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले असून धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

परिणामी काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस नोंदवला गेला आहे. परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील अक्कलपाडा आणि शिरपूर तालुक्यातील अनेर धरणाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने दोन्ही धरणांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पांझरा आणि अनेर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लळींग गावात ढगफुटीसदृश पाऊस

धुळे तालुक्यातील लळींग गावात अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यांमधील पाणी ओसंडून वाहू लागल्याने आदिवासी वस्तीतील एका घरात पाणी शिरल्याची घटना घडली. तसेच नाल्याच्या प्रवाहातील अडथळ्यांमुळे विठ्ठल मंदिर चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला. पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आदिवासी वस्ती आणि गवळीवाड्यावर पाण्याचा फटका

महामार्गालगतच्या नाल्याचा प्रवाह अडथळ्यांमुळे बंद झाल्याने आदिवासी वस्ती तसेच विठ्ठल मंदिर चौकाजवळील गवळीवाड्यात पावसाचे पाणी घुसले. अनेक घरांच्या परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, महामार्गावरील गटारीचे तोंड बंद झाल्यामुळे डोंगराकडून येणारे पावसाचे पाणी थेट गावात शिरले. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon