हतनूर धरणातील वाढत्या पाणीसाठ्यामुळे निर्माण झालेल्या बॅकवॉटरचा फटका सावदा परिसरातील धामोडी गावाला बसला आहे. सततच्या पावसामुळे बॅकवॉटरची पातळी वाढल्याने गावातील सुमारे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा पडला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची वेळ आली आहे.
गावात पाणी शिरू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. गावातील मंदिरात तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
धामोडी गावाला पावसाळ्यात अशा परिस्थितीचा वारंवार सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हतनूर धरण अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात बॅकवॉटरमुळे गावातील अनेक घरांभोवती पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्वयंसेवक आणि लोकप्रतिनिधींनी मदतकार्य राबवत नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी सहकार्य केले.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली असून बॅकवॉटरच्या समस्येवर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती मदत आणि उपाययोजना सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
