Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

जळगाव हादरलं! झोपेत असलेल्या दोन लेकरांवर बापाचा कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका वडिलाने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली. या हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी दोन्ही मुले घरात झोपलेली असताना त्यांचे वडील सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) यांनी अचानक कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केले. गंभीर दुखापतीमुळे मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांनाही कळविले. अडावद पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून काही तासांत त्याला ताब्यात घेतले.

घटनास्थळाचा पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड आणि अन्य महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर पुढील तपासाला अधिक दिशा मिळणार आहे.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती, आर्थिक अडचणी किंवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपीची चौकशी सुरू असून नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांचे जबाबही नोंदवले जात आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon