Dailyhunt

जळगाव येथून 'निओ प्रो भारत सिंडिकेट'चा शुभारंभ; संशोधनातून सामाजिक नवनिर्माणाचा युवा निर्धार

त्तर महाराष्ट्राची शैक्षणिक नगरी असलेल्या जळगाव शहरात सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. येथील आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका विशेष सोहळ्यात 'निओ प्रो भारत सिंडिकेट' या महत्त्वाकांक्षी संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली.

सत्यशोधक समाजाच्या १५३ व्या स्थापना वर्षाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला. महात्मा फुलेंनी ज्या वैचारिक अधिष्ठानावर सत्यशोधक समाजाची पायाभरणी केली होती,त्याच क्रांतीकारी विचारांना आधुनिक काळाची जोड देत या सिंडिकेटची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेशी जोडले गेलेले भारतभरातील प्रतिभावान युवक-युवती. तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत देशाच्या कानाकोपऱ्यातील शेकडो बुद्धीवान तरुण या सोहळ्यासाठी आभासी (Virtual) पद्धतीने उपस्थित होते. जळगावच्या प्रत्यक्ष सभागृहात आणि आभासी व्यासपीठावर जमलेला हा युवा वर्ग आता समाजहितासाठी एका सूत्रात बांधला गेला आहे. युवा वर्गाला केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्यात आणि धोरण निर्मितीत सक्रिय करणे, हा या सिंडिकेटचा मुख्य उद्देश आहे.

संस्थेची कार्यपद्धती स्पष्ट करताना संस्थापक अध्यक्ष चिन्मय महाजन यांनी सांगितले की, 'निओ प्रो भारत सिंडिकेट' ही संस्था केवळ चर्चा करण्यावर भर न देता, संशोधनाच्या माध्यमातून समाजात नवनिर्माण करण्याचे कार्य करेल. समाजातील प्रलंबित प्रश्न आणि समस्या यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यावर आधुनिक उपाय शोधण्याचे काम ही संस्था करणार आहे.

उपस्थित युवकांनी नमूद केले की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी आपली प्रतिभा विखुरलेली न ठेवता ती एका ध्येयाकडे वळवणे गरजेचे आहे. निओ प्रो भारत सिंडिकेट हे व्यासपीठ अशाच प्रतिभावान तरुणांसाठी एक हक्काची जागा ठरणार आहे. संशोधनातून समाज प्रबोधन आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने नवनिर्माण, असा हा प्रवास जळगावच्या या मातीतून देशभर पसरणार आहे.

या संस्थेच्या स्थापनेमुळे सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांमध्ये एक मोठी उमेद निर्माण झाली असून, आगामी काळात ही संस्था वैचारिक परिवर्तनाचे मुख्य केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon