Dailyhunt

जळगावात 'मोफत टूर पॅकेज'च्या आमिषाने 1.70 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.!

ळगाव शहरात 'मोफत टूर पॅकेज'चे आमिष दाखवून एका वित्तीय सल्लागाराची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशातच सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गौतमराव साळुंखे (रा. जळगाव) यांना एप्रिल 2025 मध्ये एका अज्ञात कंपनीकडून फोन आला. संबंधित व्यक्तींनी स्वतःला नामांकित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत, "तुम्ही कार कंपनीकडून कॉम्प्लिमेंटरी टूर पॅकेज जिंकले आहे" असे सांगितले. या आमिषामुळे साळुंखे यांचा विश्वास बसला.

यानंतर साळुंखे यांना सहकुटुंब शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तिथे सात दिवसांच्या आकर्षक सहलीचे प्रलोभन दाखवत विविध सुविधा आणि ऑफर्सची माहिती देण्यात आली. प्रतिनिधींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साळुंखे यांनी आपल्या क्रेडिट कार्डद्वारे एकूण सुमारे 1 लाख 70 हजार रुपयांची रक्कम अदा केली.

मात्र, पैसे भरल्यानंतर सहलीचे नियोजन करण्यासाठी संबंधित कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, वारंवार टाळाटाळ करण्यात येऊ लागली. काही काळानंतर संपर्क पूर्णपणे तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे साळुंखे यांच्या लक्षात आले.

घटनेची गांभीर्याने दखल घेत साळुंखे यांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी क्रमांकावरून येणारे फोन, मोफत भेटवस्तू, लकी ड्रॉ किंवा टूर पॅकेज यांसारख्या आमिषांवर सहज विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon