Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

जिल्हा बँक निवडणुकीची तयारी वेगात; नोव्हेंबरमध्ये मतदानाची शक्यता, १५ लाखांचा निधी जमा

ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक खर्च भागविण्यासाठी बँकेने सहकार विभागाकडे १५ लाख रुपये आगाऊ जमा केले आहेत.

या निधीनंतर निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला अधिकृतपणे सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सुमारे आठ हजार मतदार सभासद नवीन संचालक मंडळाची निवड करणार आहेत.

जिल्हा बँकेची मागील निवडणूक नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. नियमानुसार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने यंदा पुन्हा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार यादी अद्ययावत करणे, हरकती आणि दावे निकाली काढणे, निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदान केंद्रांची तयारी, मतमोजणीची व्यवस्था तसेच इतर प्रशासकीय बाबींसाठी जमा करण्यात आलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे.

शतकाहून अधिक इतिहास असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना १९१६ मध्ये झाली होती. मोजक्या सभासदांपासून सुरू झालेली ही संस्था आज हजारो संस्थात्मक मतदारांची बँक बनली असून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात तिचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.

यंदाच्या निवडणुकीत एक महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे अनेक विद्यमान दिग्गजांना निवडणुकीपासून दूर राहावे लागू शकते. मात्र, आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी काही नेते कुटुंबातील सदस्य किंवा निकटवर्तीयांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.

निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी प्रशासकीय हालचालींना सुरुवात झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा राजकीय रंग आता अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon