मेघालयच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचं कथित 'ऑपरेशन लोटस' राज्यात जोर धरत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजेच UDPचे 9 आणि तृणमूल काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
या चर्चांनुसार, एकूण 13 विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. असं झाल्यास सध्या विधानसभेत दोन आमदार असलेल्या भाजपची संख्या थेट 15 वर पोहोचू शकते. मात्र, या संभाव्य पक्षांतराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य गटात मेघालयचे माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा यांच्याही नावाची चर्चा आहे. 60 सदस्यांच्या मेघालय विधानसभेत सध्या UDPचे 12 आणि TMCचे 4 आमदार आहेत. यातील काही आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
दरम्यान, UDPमध्ये काही काळापासून अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. सप्टेंबर 2025 मधील मंत्रिमंडळातील बदलानंतर पक्षातील गटबाजी वाढल्याचं बोललं जात आहे. आगामी 2028 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मात्र, UDPच्या सूत्रांनी भाजपमध्ये जाण्याची शक्यता स्पष्टपणे मान्य केलेली नाही. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने या चर्चांवर सावध प्रतिक्रिया देत पक्षात फूट पडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नसल्याचं सूचित केलं आहे. दुसरीकडे, UDPचे नेते पॉल लिंगदोह यांनी यापूर्वी पक्षांतराच्या चर्चांना अफवा असल्याचं म्हटलं होतं.
भाजपची भूमिका काय?
मेघालय भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आमदारांशी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य भाजपच्या नेतृत्वाने UDPच्या काही आमदारांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, आता हे आमदार थेट केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करत असल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या मेघालय विधानसभेत भाजपचे अलेक्झांडर लालू हेक आणि सनबोर शुल्लाई हे दोन आमदार आहेत. सनबोर शुल्लाई हे राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे मेघालयमध्ये खरंच मोठं पक्षांतर होणार का? TMC आणि UDPचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार का? आणि या संभाव्य राजकीय समीकरणाचा 2028च्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
