Dailyhunt

मंत्रालयात भ्रष्टाचार सुरूच; मोठ्या अधिकाऱ्याला ६.३७ लाखांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक..!

हाराष्ट्र: राज्य प्रशासनात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील एका अधिकाऱ्याला तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

या कारवाईमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.

या लाच प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विलास लाड याच्यावर ग्रामविकास विभागाशी संबंधित निधी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. संबंधित काम मंजूर करून देण्यासाठी त्याने मोठी रक्कम मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नियोजनबद्ध सापळा रचला. नवी मुंबईतील खारघर परिसरात ही कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे आरोपी अधिकाऱ्याने ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

या धडक कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. मंत्रालयातील कामकाजात लाचलुचपत उघडपणे होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. राज्यातील एका मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यामुळे मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सतत उघड होत असलेल्या अशा घटनांमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon