Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मराठी प्रमाणपत्र वाटप की भोजपुरीचा जल्लोष? प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

श्चिम उपनगरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण कार्यक्रमावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बोरीवलीतील कोरा केंद्र मैदानावर बुधवारी रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

मात्र, कार्यक्रमाच्या सुरुवातीला भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आल्याने या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सुमारे 20 हजार रिक्षाचालकांना मराठी भाषा प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे देण्यात आली.

मात्र, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भोजपुरी गाण्यांवर तरुणींचे नृत्य सादर करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या कार्यक्रमावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या प्रकारावर टीका केली आहे. त्यांनी नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कार्यक्रमाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा असताना अशा प्रकारचे नृत्य सादर करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

या मुद्द्यावरून चित्रे यांनी आमदार प्रकाश सुर्वे तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपण्याच्या दाव्यांमध्ये अशा कार्यक्रमातील सादरीकरणाचा मेळ कसा घातला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मराठी भाषा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवरील नृत्याचा समावेश नेमका कशासाठी करण्यात आला, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon