Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मित्रांसोबत फिरायला गेला आणि काळाने घातला घाला; धबधब्याच्या दरीत पाय घसरून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटना..

ळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या गोद्री येथील डालकी धबधब्यावर मंगळवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाय घसरून तो सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळला.

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव आकाश सुनील पडघाण (वय 23, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे आहे. तो आपल्या काही मित्रांसह मंगळवारी गोद्री (ता. जामनेर) येथील प्रसिद्ध डालकी धबधबा पाहण्यासाठी आला होता. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास सर्व मित्र धबधब्याच्या परिसरात फिरत असताना आकाशचा अचानक तोल गेला. पाय घसरल्याने तो जवळपास 20 फूट खोल दरीत पडला. या अपघातात त्याच्या जबड्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली.

घटना घडल्यानंतर मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याला सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतर खांद्यावरून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून त्याला प्रथम फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

आकाशच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. अनेकांचे अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर तेही तातडीने रुग्णालयात दाखल झाले.

आकाशने यावर्षी एम.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दोन विवाहित बहिणी असून वडील मंडप डेकोरेशनच्या व्यवसायाशी संबंधित काम करतात. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भादोला गावातही शोककळा पसरली असून आकाशच्या निधनाबद्दल ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने पुन्हा एकदा पावसाळ्यात धबधबे आणि पर्यटनस्थळांवर फिरताना आवश्यक ती काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon