मुंबईतील वांद्रे परिसरातील भीषण अपघातानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. कारच्या धडकेत आठ वर्षीय अंश गुप्ता याचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी महिला चालकाच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी वांद्रे पश्चिम येथील जॉन बाप्टिस्ट रोडवर ही दुर्घटना घडली. अंश रस्ता ओलांडत असताना मेघा रावल हिच्या कारची त्याला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंशचा मृत्यू झाला. अंश हा गुप्ता दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. तब्बल 15 वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबात मुलाचा जन्म झाला होता.
कार चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा रावल कार चालवत असताना मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी अंश रस्ता ओलांडत होता. कारचा वेगही अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे समोर आलेल्या मुलावर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही आणि कार त्याच्या अंगावरून गेल्याचं सांगितलं जात आहे.
साक्षीदाराला जबाब बदलण्याची ऑफर?
या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या संदीप सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोपीच्या कुटुंबीयांकडून आपला जबाब बदलण्यासाठी दबाव आणला जात असून, त्यासाठी आमिष दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यामुळे आता अपघातासोबतच साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.
अंशचा वाढदिवस काही दिवसांवरच होता
अंशचा वाढदिवस 2 सप्टेंबरला होता. वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधीच झालेल्या या दुर्घटनेने गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेघा रावलविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 105, 281, 125 आणि मोटार वाहन कायद्यातील कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता अपघाताची नेमकी परिस्थिती, चालकाचा निष्काळजीपणा आणि साक्षीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास सुरू आहे.
