Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मोठी बातमी: अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचं महिला प्रदेशाध्यक्षपद ठरलं; वैशाली नागवडे यांची नियुक्ती मात्र, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय नाहीच..!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल करत महिला आणि युवक आघाडीला नवे नेतृत्व दिले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वैशाली नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी, तर निखिल ठाकरे यांची युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

बुधवारी दोघांनाही नियुक्तीपत्र देत नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. अखेर पक्षाने वैशाली नागवडे यांच्या रूपाने नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. ‘देवगिरी’ निवासस्थानी झालेल्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या बैठकीत महिला आणि युवक आघाडीला नव्या नेतृत्वाची संधी देण्यावर एकमत झाले. त्यानुसार वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे यांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी पुण्यातील आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, पक्षाने वैशाली नागवडे यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या असून त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. दौंड तालुक्यातील सक्रिय नेत्या म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे.

मात्र, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या पदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे आणि वैशाली मोठे यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. या नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या आगामी बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon