Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, देशभरात खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट.!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जुलैदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून, मेलबर्न येथे भारतीय समुदायाच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या 'मेलबर्न मीट्स मोदी' या विशेष कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.

मात्र, या दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर आलेल्या एका कथित धमकीच्या पोस्टने खळबळ उडाली आहे.

वृत्तानुसार, मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियम येथे ९ जुलै रोजी होणाऱ्या “मेलबर्न मीट्स मोदी” कार्यक्रमाच्या प्रचारासाठी फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये ही कथित धमकी देण्यात आली.

“अबू मुस्तफा” नावाच्या फेसबुक अकाउंटवरून, “स्टेडियमचे छत बंद ठेवावे, अन्यथा मोदी ऑस्ट्रेलियात त्यांच्या मृत्यूसाठी येत आहेत,” अशा आशयाची कमेंट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ही कमेंट समोर येताच ऑस्ट्रेलियातील सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. संबंधित पोस्ट आणि अकाउंटची चौकशी सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी संबंधित फेसबुक अकाउंटशी जोडलेला IP अ‍ॅड्रेस शोधण्याचे काम सुरू केले आहे. या धमकीमागे नेमके कोण आहे, ती केवळ सोशल मीडियावरील खोडसाळ पोस्ट होती की प्रत्यक्ष धोका होता, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. तसेच तपास सुरू असल्याने अधिक तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळ, स्टेडियम परिसर आणि दौऱ्याशी संबंधित सर्व ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या कथित धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा प्रत्येक बाब अत्यंत बारकाईने तपासत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon