Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मुंबईवर संकटाची सावली? सोशल मीडियावरील पोस्टनंतर तपास यंत्रणा अलर्ट

सोशल मीडियावर मुंबईसह देशावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित पोस्टमध्ये ऑगस्ट महिन्यात विशेषतः 9 ते 18 ऑगस्टदरम्यान मोठ्या दहशतवादी कारवायांची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका खात्यावरून भारतासाठी धोक्याचा इशारा देणारी पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी मोठा हल्ला करू शकतात, असा दावा करण्यात आला होता. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ही पोस्ट संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी तिची पडताळणी सुरू केली.

प्राथमिक तपासात पोस्ट करणाऱ्या व्यक्तीकडे कोणती ठोस माहिती होती का, अथवा हा केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न होता, याचा शोध घेतला जात आहे. संबंधित सोशल मीडिया खात्याची माहिती आणि पोस्टचा स्रोत तपासण्यासाठी तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांत मुंबईसह विविध ठिकाणांबाबत बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ल्यांच्या खोट्या धमक्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक संदेशाची किंवा पोस्टची पोलिसांकडून गांभीर्याने चौकशी केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी अप्रमाणित सोशल मीडिया पोस्टवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि संशयास्पद संदेश किंवा पोस्ट आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon