अमळनेर तालुक्यातील खडके येथील ५६ वर्षीय नामदेव दामू सोनवणे यांचा निसर्डी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव सोनवणे हे सोमवार (दि. ३ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी निसर्डी धरणावर गेले होते. मात्र रात्रभर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी धरणाच्या काठावर त्यांचे कपडे व चप्पल आढळून आल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने धरणात शोधमोहीम राबविण्यात आली. शोधादरम्यान पाण्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी त्याची ओळख नामदेव सोनवणे अशी पटविली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तात्काळ ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे हलविण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी सुमारे १०.३० वाजता त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार काशिनाथ पाटील करीत आहेत.
