Dailyhunt

पाचोऱ्यात उष्माघाताचा बळी! 32 वर्षीय फळ विक्रेत्याचा मृत्यू, परिसरात हळहळ.!

राज्यातील वाढत्या तापमानाने आता जीवघेणे रूप धारण केले असून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हि दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच पाचोरा शहरात उष्माघातामुळे एका तरुण फळ विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाचोरा शहरातील बाहेरपुरा रहिवासी आनंद नथू भोई वय 32 हे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. सध्या प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे दिवसभर उन्हात उभे राहून व्यवसाय करताना त्यांना उष्णतेचा तीव्र फटका बसला. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बाहेरपुरा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नुकतेच जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. हवामान विभागानेही दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon