पतीने दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरार पश्चिम परिसरात घडली आहे. या हल्ल्यात २२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी पहिल्या पत्नीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. राजकुमार प्रसाद (वय ३१) हे नालासोपारा पश्चिम परिसरात राहत असून त्यांचे पहिल्या पत्नी लक्ष्मीसोबत काही कारणांमुळे मतभेद झाले होते. त्यानंतर ते दोघे वेगळे राहत होते. याच काळात राजकुमार यांनी कोमल अनिल सरोज (वय २२) यांच्याशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर कोमल विरार पश्चिम येथील मेफेयर गार्डन परिसरात राहत होती. मात्र, पतीने दुसरे लग्न केल्याने लक्ष्मी नाराज होती. याच रागातून ती कोमलच्या घरी गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
वादानंतर अचानक हल्ला:
घरी पोहोचल्यानंतर लक्ष्मी आणि कोमल यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हल्ल्यात झाले. लक्ष्मीने चाकूने कोमलच्या हातावर वार केल्याचा आरोप आहे. यानंतर तिने कोमलला एका खोलीत कोंडून तिच्या डोक्यावर आणि पाठीवर चाकू तसेच त्रिशूळाने वार केल्याची माहिती आहे. एवढ्यावरच न थांबता कोमलच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पतीला व्हिडीओ कॉल करून धमकी:
हल्ल्याच्या वेळी लक्ष्मीने पती राजकुमार यांना व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. या कॉलदरम्यान तिने कोमलला मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच राजकुमार तातडीने घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी जखमी कोमलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बोलिंज पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि लक्ष्मीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
