भारतीय हवाई दलातील शौर्य आणि 2019 च्या भारत-पाकिस्तान हवाई संघर्षामुळे देशभरात चर्चेत आलेले माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी आता व्यावसायिक विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आहे.
वर्धमान हे गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी FLY91 मध्ये पायलट म्हणून रुजू झाले आहेत.
अभिनंदन यांनी ऑगस्टमध्ये FLY91 मध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलातील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीनंतर त्यांची ही नवी जबाबदारी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
2019 च्या हवाई संघर्षानंतर आले चर्चेत
फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट हवाई कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी अभिनंदन वर्धमान हे मिग-21 बायसन विमान उडवत होते. या कारवाईदरम्यान त्यांनी पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारताकडून करण्यात आला होता.
मात्र, त्यानंतर त्यांचे विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळले आणि ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले. जवळपास 60 तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर अभिनंदन देशभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.
वीर चक्राने सन्मान
हवाई संघर्षातील त्यांच्या शौर्याची दखल घेत भारत सरकारने अभिनंदन वर्धमान यांना 2021 मध्ये वीर चक्र प्रदान केले. भारतीय हवाई दलातील सेवेनंतर आता त्यांनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
FLY91 ची प्रादेशिक कनेक्टिव्हिटीवर नजर
गोव्यात मुख्यालय असलेल्या FLY91 ने मार्च 2024 मध्ये व्यावसायिक विमानसेवा सुरू केली. एअरलाइनकडे सध्या ATR 72-600 प्रकारची सहा विमाने असून गोवा आणि हैदराबाद ही तिची प्रमुख ऑपरेशनल केंद्रे आहेत.
प्रादेशिक शहरांना हवाई मार्गाने जोडण्यावर भर देणाऱ्या या कंपनीत अभिनंदन वर्धमान यांची एंट्री विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी लढाऊ विमान उडवणारा वैमानिक आता प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवताना दिसणार आहे.
