Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पारोळा महामार्गावर केमिकल टँकरचा भीषण अपघात; भीषण आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू.!

धुळे महामार्गावरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ आज शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. एका भरधाव केमिकल टँकरवे (क्रमांक: GJ 18 BV 8315) समोर चालणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसताच केमिकल टँकरने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्दैवी घटनेत टँकर चालकाचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला आहे.

अपघाताच्या वेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. प्राथमिक अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे चालकाला समोरील कंटेनर आणि टोलनाक्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा. टोलनाक्याच्या अगदी जवळच हा अपघात झाल्याने टोल प्लाझाच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे भयानक स्वरूप आणि त्यातच कोसळणारा पाऊस यामुळे सुरुवातीला बचावकार्यात आणि आग विझवण्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. या थरारामुळे महामार्गावरील वाहनधारकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच पारोळा आणि धुळे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर सुमारे एका तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पारोळा पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाचा पंचनामा करणे आणि मृत चालकाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon