Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पीक विमा अर्जासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली..

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता न आल्याने ही मुदत आता 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ही माहिती देत, राज्यातील एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच संभाव्य अल निनो परिस्थिती लक्षात घेता अधिकाधिक शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अर्ज कसा करायचा?

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. तर बिगर कर्जदार शेतकरी PMFBYच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत अर्ज करू शकतात. याशिवाय PMFBY Crop Insurance या मोबाईल ॲपद्वारेही ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

तांत्रिक अडचणींमुळे वाढवली मुदत

राज्यातील अनेक भागांत संकेतस्थळ संथ गतीने चालणे, इंटरनेटमधील अडथळे आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी अर्ज करू शकले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने अर्जासाठी अतिरिक्त कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 61 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

आतापर्यंत राज्यभरातील 61 लाख 82 हजार 218 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. विभागनिहाय नोंदणीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर असून, त्यानंतर अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक, लातूर, कोल्हापूर आणि कोकण विभागांचा क्रमांक लागतो.

राज्यातील एकही पात्र शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी 10 ऑगस्ट 2026 पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon